करमाळा : पुढारी वृत्तसेवा
दौंड ते कलबुर्गी या नव्याने सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाडीचे केम, जेऊर, पारेवाडी रेल्वे स्थानकावर ग्रामस्थ व प्रवासी संघटनेकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी चालक व गार्डचा प्रवासी संघटनेकडून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य पी.जी. मेहता, व्हटकर, सुहास सूर्यवंशी, अल्लाउद्दीन मुलाणी, यशवंत कुदळे, शेख, दोशी आदी रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. येथील प्रवाशातून अनेक वर्षांपासून या गाडीची वारंवार मागणी होत होती. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ही रेल्वे गाडी सुरू झाल्याने प्रवाशातूनही मोठा आनंद व्यक्त होत आहे.
यावेळी जेऊर, केम, पारेवाडी रेल्वे स्टेशनवर प्रवासी संघटने कडून हार घालून व श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले.ही नवीन रेल्वे दौंड येथून पहाटे 5 वाजता निघणार असून पारेवाडी येथे 5.49, जेऊरला 6.25 तर केम येथे 6.44 वाजता येणार आहे. कुर्डूवाडीत 7:10 मिनिटांपर्यंत पोहोचणार आहे .कलबुर्गी येथे 11 वाजता पोहोचेल. पुन्हा 4:10 वाजता कलबुर्गी येथून निघून कुर्डूवाडीत 7:47 मी येऊन दौंड येथे रात्री 10:22 मिनिटाला पोहोचणार आहे. या गाडीला भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुईवाडी, माढा, मोहोळ सोलापूर, टिकेकरवाडी, दुधनी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, गाणगापूर रोड येथे थांबा देण्यात आला आहे. गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी व उजनी धरणग्रस्त क्षेत्रातील वाशिंबे रेल्वे स्टेशनला प्रवासी थांबा मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे संघटनेमार्फत पाठपुरावा करणेत येत आहे अशी माहिती प्रवासी सेवा संघ सोलापूरचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.
दौंड कलबूर्गी गाडी कायमस्वरूपी करण्यासाठी व वाशिंबे रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी प्रवासी सेवा संघाकडून सध्या पाठपूरावा सुरू आहे. रेल्वे प्रवाशांनीही जास्तीत जास्त या रेल्वेने प्रवास करावा असे आवाहन जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी यांनी केले आहे.