सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडले होते. ते पाणी शनिवारी (दि. 19) चिंचपूर आणि औज बंधार्यात पोहोचले आहे. दोन्ही बंधारे उजनीच्या पाण्याने साडेचार मीटर भरले आहेत. त्यामुळे शहराची दोन महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
औज बंधार्यातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे भीमा नदीच्या माध्यमातून उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी आठ एप्रिलला पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी (दि. 18) औज बंधार्यात पाणी येणे अपेक्षित होते. मात्र, उजनीच्या पाण्याचा प्रवास संथगतीने चालू होता. त्यामुळे पाणी एक दिवस उशिरा पोहोचले आहे. या पाण्याने औज आणि चिंचपूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आले आहेत. दोन्ही बंधार्यांतील पाणीसाठा 50 ते 60 दिवसांपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे शहरावासीयांची दोन महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. पिण्यासाठी सोडण्यात आलेले हे पाणी शेवटचे आवर्तन आहे.