करमाळा : भरधाव वेगाने जाणार्या अज्ञात वाहनाने वारकर्याला ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गिरीधर शहाजी गाडेकर (वय 83, रा. शिंगवे केशव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे मृत झालेल्या वारकर्याचे नाव आहे. हा अपघात मंगळवार एक जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील देवळाली येथील पांडुरंग गिरी गोसावी यांच्या निवासस्थानासमोर झाला आहे.
श्रीराम सेवाधाम शिंगवे दत्ताचे, येथून हभप सुखदेव महाराज गाडेकर यांची दिंडी पंढरपूर येथे प्रतिवर्षी जाते. करमाळा येथे नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीप शिंदे तसेच डॉ. किशोर शेळके यांच्याकडे सकाळचा चहापान करून नवनाथ थोरात पेंटर यांच्याकडे भोजन करून ती निघते.
ती देवळाली येथील पांडुरंग गिरी गोसावी यांच्याकडे मुक्कामाला असते. याठिकाणी सायंकाळच्या सुमारास गाडेकर हे झोपण्याची व्यवस्था पाहण्यासाठी सतीश कानगुडे यांच्याकडे गेले होते. त्यानंतर ते जेवणासाठी पांडुरंग गिरी गोसावी यांच्याकडे निघाले होते. परंतु ते बराच वेळ झाला न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला असता त्यांना रस्त्यावरून जाताना अज्ञात वाहनाने मुख्य रस्त्यावर ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले.
ते रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्याने त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर दोन जुलै रोजी शवविच्छेदन करून त्यांना शिंगवे दत्ताचे या त्यांच्या मूळगावी नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत करमाळा पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पंचनामा केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर दिंडीचालक हभप सुखदेव महाराज गाडेकर यांनाही धक्का बसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करावे लागले. यानंतर सदरची दिंडी ही पुढे पंढरपूरकडे पांडुरंगाच्या ओढीने मार्गस्थ करण्यात आली. सदरच्या घटनेबाबत पोलिसांत याची नोंद करण्यात आली आहे.
पंढरपूरच्या वारीसाठी जाणार्या वारकर्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे या मयत झालेल्या वारकर्याच्या वारसांना तत्काळ चार लाख रुपयांची मदत शासनाने त्वरित देऊन केलेल्या घोषणेचे पालन करावे.- गहिनीनाथ ननवरे, माजी सभापती, पंचायत समिती, करमाळा