कामती (सोलापूर): वाघोली येथे शुक्रवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. एका घरात घुसून महिलेच्या गळ्याला चाकू लावत ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, याच रात्री चोरट्यांनी परिसरात आणखी पाच घरे आणि एक गॅरेज फोडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापासह भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील उदय मल्लिनाथ पाटील (वय २९) हे आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते. पहाटे दीडच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात येताच एका चोरट्याने उदय यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चोरट्यांनी घरातील मुद्देमाल लुटला. चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, १३ हजारांचे दोन मोबाईल फोन, १२ हजार रुपये रोख रक्कम असे एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे समोर आले आहे.
पाटील यांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर चोरट्यांचे सत्र थांबले नाही. त्यांनी परिसरात आणखी काही ठिकाणी हात साफ करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दत्तात्रय तानवडे, चंद्रकांत कुंभार, आणि बहादूर हरणे यांची बंद घरे फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र सुदैवाने त्यांच्या हाती काही लागले नाही. राजकुमार माने यांच्या घरातून किरकोळ २२ रुपये चोरीला गेले. तर एका गॅरेजमधून सुमारे ३ हजार रुपयांचे सामान चोरट्यांनी लंपास केले. या सर्व घटनांमुळे वाघोली परिसरात दहशतीचे वातावरण आहे. उदय पाटील यांनी कामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस एकाच रात्री झालेल्या या साखळी घरफोड्यांचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.