सोलापूर : गेल्या 30 वर्षांपासून राजकारणात घराणेशाही हा मुद्दा चर्चिला जात आहे. उमेदवारी देताना घराणेशाहीवरुन आरोप-प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न पुरेपुर केला जातो. सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मतदारांनी घराणेशाहींना नाकारले आहे. तर काही ठिकाणी स्वीकारले आहे.
मोहोळ मतदारसंघात माजी आ. राजन पाटील यांचे वर्चस्व कायम असले तरी मागील तीन विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजन पाटील जे उमेदवार सुचवतील त्यांचा विजयी निश्चित होता. यंदा मात्र पाटील कुटूंबातील उमेदवार नसला तरी त्यांनी सूचविलेल्या यशवंत माने यांचा पराभव झाला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात (कै.) भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना सलग दोन्ही निवडणुकीत मतदारांनी नाकारले. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनाही जनतेने नाकारले. तर माढ्यात धनाजी साठे यांच्या सून मीनल साठे यांनाही मतदारांनी कौल नाकारला आहे.
माढा मतदार संघात गेल्या 30 वर्षांपासून बबनराव व संजयमामा या शिंदेबंधूचे राज्य होते. बबनदादा शिंदे हे सहा वेळा आमदार होते. यंदा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा रिंगणात होते. त्यांच्यावर घराणेशाहीच्या आरोप झाला. अखेर रणजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला. बबनदादा शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे करमाळ्यातून 2019 साली आमदार झाले. परंतू यंदा जनतेने त्यांनाही नाकारले. करमाळ्यातूनच माजी मंत्री (कै.) दिगंबर बागल यांचे चिरंजीव दिग्वीजय बागल यांनाही जनतेने नाकारले.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात ज्यांनी चाळीसहून अधिक वर्षे शहर काँग्रेसची पर्यायाने सुशीलकुमार शिंदे यांची बाजू (कै.) विष्णूपंत कोठे यांनी सांभाळली. त्यांचे पुत्र महेश कोठे यांना सोलापूर शहर उत्तरमधील जनतेने नाकारले आहे. विष्णूपंत कोठे यांचे नातू देवेंद्र कोठे यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघात घराणेशाही असूनही मतदारांनी स्वीकारले आहे.
सांगोल्यामध्ये शेकापचे (कै.) गणपतराव देशमुख हे तब्बल 50 वर्षे आमदार होते. त्यानंतर सन 2019 च्या विधानसभेला त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना मतदारांनी नाकारले होते. यंदा विधासभेला त्यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदारांनी त्या देशमुखांना स्वीकारुन शेकापला विजयी केले आहे.