सोलापूर : सोलापूरच्या प्रत्येक निवडणुकीचे मतमोजणी केंद्र म्हणून विख्यात असलेले रामवाडी गोडावून सध्या विविध कारणांनी सील करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी इतिहासात प्रथमच रामवाडी गोडावूनशिवाय सात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.
महापालिका असो अथवा लोकसभा, विधानसभेची मतमोजणी रामवाडी गोडाऊन मध्ये घेतली जात असे, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीसंदर्भातील काही उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने रामवाडी येथील गोडाऊनमध्ये त्या निवडणुकीची मतदान यंत्रे न्यायालयाच्या आदेशान्वये ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रामवाडी गोडावून सील आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाशिवाय सदर मतदान यंत्रे हलविता किंवा उघडता येणार नसल्याने, सोलापूर महानगरपालिका निवडणूकीची मतमोजणी कमी वर्दळीच्या सात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे.
महापालिका आयुक्तांनी या संदर्भात पर्यायी जागांचा आढावा घेत सात ठिकाणांचा प्रस्ताव निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सातही ठिकाणच्या इमारतींमध्ये प्रशस्त जागा, पार्किंग, प्रवेश-निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था आदी बाबींचा विचार करण्यात आलेला आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी केंद्रावर नेते, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे शहरातील गजबजलेल्या भागापासून दूर कमी वर्दळीच्या ठिकाणी मतमोजणी केंद्र असावे असा विचार पुढे आला. त्यानुसार शहराच्या विविध भागातील कमी वर्दळीची, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम, अन्य सोई-सुविधांनी युक्त अशी सात ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
नेहमी मतमोजणी करण्यात येणारे रामवाडी गोडावून सध्या सील आहे. तसेच महापालिका निवडणूकीच्या काळात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा आहे. मतदानाच्या दिवशी शोभेचे दारूकाम तर मत मोजणीच्या दिवशी यात्रेचा शेवटचा दिवस कपड्डकळ्ळीचा विधी आहे. त्यामुळे या कालावधीत शहर परिसरात असणारी भाविकांची गर्दी, पोलिस प्रशासनावर असलेला ताण पाहता महानगरपालिका निवडणूक मतमोजणी शहराच्या कमी वर्दळीच्या सात ठिकाणांवर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.- डॉ. सचिन ओम्बासे, महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी