सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी रविवारी (दि. 21) मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. ईव्हीएमवर मतमोजणी होणार असल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलूज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुर्डुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पाडले होते, तर मंगळवेढा नगराध्यक्ष, नगरसेवकपदासाठी शनिवारी 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आज सर्व नगरपालिकेची मतमोजणी होणार आहे. अनगर नगरपंचायतीची बिनविरोध निवडीची घोषणा होणे बाकी आहे.
पंढरपूरमध्ये भालके, परिचारक गटांमुळे ही निवडणूक चुरशीची बनली असून, शिंदे शिवसेना गटाचे आ. शहाजी पाटील यांचे भावनिक आव्हान आणि शेकाप-भाजप यांच्यातील युतीमुळे ही निवडणूक राज्यात गाजली. अक्कलकोटमध्ये आ. सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तेथे काँग्रेस, शिवसेनेने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असल्याने म्हेत्रे कुटुंबासाठी ही अस्तित्वाची निवडणूक ठरणार आहे.
मतमोजणीसाठी 5 ते 12 टेबल मांडण्यात येणार असून, 3 ते 11 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. ईव्हीएमवर मतमोजणी होणार असल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित असून, मतमोजणी केंद्रावर ध्वनिक्षेपक यंत्रातून निकाल घोषित केले जाणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.