पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 मधील तरतुदीनुसार चालवण्यात येते. या अधिनियमातील तरतुदीनुसार प्रतिवर्षी शासन नियुक्त लेखापरीक्षकमार्फत लेखा परीक्षण करण्यात येते. त्याचा अहवाल शासनास व धर्मादाय आयुक्त यांना सादर करण्यात येतो. मात्र, लेखापरीक्षण अहवाल मंदिर समिती ला अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
2023-24 या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षणाचे कामकाज शासन नियुक्त लेखा परीक्षक यांच्यामार्फत सुरू आहे. तथापि, त्यांनी लेखापरीक्षणा दरम्यान काही मार्गदर्शक सूचना व सुधारणा सुचित केल्या होत्या. त्याची देखील पूर्तता करण्यात आली आहे. संबंधित लेखा परीक्षक यांच्याकडून अंतिम अहवाल मंदिर समितीस प्राप्त झालेला नाही.
संबंधित लेखा परीक्षक यांच्याकडून लेखापरीक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर, मंदिर समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. तद्नंतर अधिनियमातील तरतुदीनुसार धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे निदेश घेऊन व त्याचा अनुपालन अहवाल तयार करून शासनास सादर करण्यात येतो. शासनामार्फत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.