पंढरपूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे माघ शुद्ध 1 ते 5 या कालावधीत संपन्न होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे, वसंत पंचमी अर्थात दि. 23 जानेवारी रोजी परंपरेनुसार विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन दि. 19 ते 22 जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी 4 ते 6 या वेळेत करण्यात आले आहे. या कथेचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद्भागवताचार्य साध्वी अनुराधा (दीदी) राजेंद्र शेटे यांच्या सुमधूर व रसाळ वाणीने होणार आहे. वसंत पंचमी दिनी सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा विधिवत मंत्रोच्चारात संपन्न होणार आहे. पहाटे काकडआरतीवेळी श्री विठ्ठलास सोन्याच्या मुकुटाऐवजी मंदिरातील पांढरे पागोटे परिधान करण्यात येते. या दिवसापासून रंगपंचमीपर्यंत श्री विठ्ठलास पांढरा पोशाख परिधान केला जातो. नित्यपूजेच्या वेळी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस गुलाल अर्पण करण्यात येतो. वसंत पंचमीच्या दिवशी फक्त याच दिवशी श्री रूक्मिणी मातेस सकाळी पांढरा पोशाख परिधान करण्यात येतो.
सकाळी 11 वाजता श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करण्यात येते. त्यानंतर श्री विठ्ठलास विवाह स्थळी येण्याचे निमंत्रण देण्यात येते. श्री रूक्मिणी मातेस पांढरा पोशाख व पारंपारिक अलंकार परिधान करून पाद्यपूजा, नैवेद्य व आरती केली जाते. दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्ती श्री विठ्ठल सभामंडपात आणून विवाह सोहळा विधीवत पार पडतो.
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तींची सवाद्य शोभायात्रा
विवाह सोहळ्यानंतर दुपारी 4 वाजता पोशाखानंतर पाद्यपूजा करण्यात येऊन विठ्ठल रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तींची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रा व्ही. आय. पी. गेट - श्री संत नामदेव पायरी - महाद्वार पोलीस चौकी - कालिका देवी मंदिर - काळा मारुती चौफाळा - नाथ चौक - तांबडा मारुती मंदिर - माहेश्वरी धर्मशाळा - महाद्वार पोलीस चौकी - पश्चिम द्वार - व्ही.आय.पी. गेट या मार्गाने निघणार आहे. अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण
भाविकांना सोहळा पाहता यावा यासाठी चौफाळा व महाद्वार पोलीस चौकी येथे एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार असून, विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. तसेच वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली.