पंढरपूर : कार्तिकी यात्रा एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध 30 प्रकारच्या पानाफुलांचा वापर करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे विठ्ठल मंदिराचे रुप मनमोहक दिसत आहे. एकादशीला मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे नयनरम्य सजावट पाहून मन सुखावले जात आहे.
श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी गाभारा, चार खांबी, सोळखांबी व श्री संत नामदेव पायरी गुलाब, झेंडू, कामिनी, आर्किट व इतर अशा 30 प्रकारच्या विविध 5 टन पाना फुलांचा वापर करून मनमोहक व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सदरची सजावट विठ्ठल भक्त राम जांभुळकर पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.
कार्तिकी यात्रा एकादशीनिमित्त भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात अल्या आहेत. भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
महत्त्वाचे सण उत्सव, खास दिवस, यात्रा या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, आकर्षक सजावट केली जाते. त्यानुसार रविवारी कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजविण्यात आले. मंदिरात आकर्षक पाना-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याने, विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे.