सांगोला : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तसेच मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे कधीही बिगुल वाजण्याची शक्यता आहे, असे बोलले जात असले तरी तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी 2024, तर एका ग्रामपंचायतींची मुदत मे 2024 मध्ये संपुष्टात आली आहे. याबाबत निवडणूक प्रोग्रॅम आला नसल्याची माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी वेगाने सुरू झाली असून, यामध्येच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. तसेच तालुक्यातील अजनाळे व बुरुंगेवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या रिक्त जागेवरील सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर निवडणुकांसाठी अध्यासीय अधिकारी म्हणून निवडी करण्यात आल्या आहेत. अजनाळे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे.
तर बुरुंगेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण ठेवण्यात आले आहे. दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी 22 जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश महसूल प्रशासन अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडून संबंधितांना देण्यात आले आहेत. सन फेब्रुवारी 2026 मध्ये सांगोला तालुक्यातील 45 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मुदत संपणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासन नवीन मतदार नोंदणी, नावात बदल, पत्ता बदल यासारख्या गोष्टी उरकून घेऊन गावपातळीवर आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.
यासह तालुक्यातील मुदत संपलेल्या 5 ग्रामपंचायतींमध्ये 20 जानेवारी 2024 रोजी सोनलवाडी, 4 जानेवारी 2024 रोजी सोनंद, 20 जानेवारी 2024 गळवेवाडी तर 31 मे 2024 रोजी राजापूर ग्रामपंचायत निवडणुकीची मुदत संपली आहे.