संंजय पाठक
सोलापूर : सातारा जिल्ह्यात भिलार हे गाव राज्य सरकारने जसे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित केले. अगदी त्याच धर्तीवर आता पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील गोर्हे बुद्रूक हे गाव व्यंगचित्रांचे गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यासाठी तेथील ग्रामपंचायतीने तसा ठरावही मंजूर केला आहे. युवा सामाजिक संस्थेच्या धनराज गरड यांनी याविषयीचा प्रस्ताव गोर्हे बुद्रूक ग्रामपंचायतीस दिला. त्यावर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मांडून याविषयी सकारात्मक विचार करून संमती दिली.
गावाच्या लौकिकाचा विचार करून युवा सामाजिक संस्थेने व्यंगचित्राचे गाव साकारण्यास गोर्हे बुद्रूकला पसंदी दिल्याबद्दल ग्रामसभेत आभार व्यक्त करण्यात आले. व्यंगचित्रांचे गाव साकारण्याचा संकल्प करत ग्रामसभेने या प्रस्तावावर विचार करून, चर्चा करून यासाठी सर्वमान्यता दिली. ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या ठरावावर ग्रामसेवक एस. पी. धोत्रे, उपसरपंच सुशांत खिरीड आणि सरपंच शारदा खिरीड यांच्या स्वाक्षर्या आहेत.
पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे शहर आहे. येथून अगदी जवळच खडकवासला धरण आणि सिंहगड किल्ला यामध्ये गोर्हे बुद्रूक हे गाव आहे. येथून थोडे पुढे गेले की पानशेत आहे. तसेच याच भागात विख्यात अभिनेते (कै.) दादा कोंडके यांचा स्टुडिओ आहे. यामुळे कला, चित्रपट, नाटक क्षेत्रातील रसिकांसह कलाकारांची याठिकाणी वर्दळ असते. तसेच याच भागात अनेक कलाकारांचे फार्म हाउस देखील आहेत. याठिकाणी पर्यटकांचा ओघ असतो, ग्रामस्थही सकारात्मक असल्यामुळे राज्यातील पहिलेच व्यंगचित्रांचे गाव म्हणून गोर्हे बुद्रूक हे गाव निवडण्यात आले.
राज्यातील पहिलेच व्यंगचित्रकारांचे गाव म्हणून साकारत असलेल्या गोर्हे बुद्रूक मध्ये कलाकारांसाठी आर्ट गॅलरी निर्माण करण्यात येणार आहे. याठिकाणी प्रत्येक शनिवारी व रविवार कलांचे त्यातही व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजिण्यात येणार आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विख्यात व्यंगचित्रकारांच्या कलाकृती याठिकाणी मोठ्या आकारात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय असंख्य दुर्लक्षित व्यंगचित्र कलाकृतींनाही यानिमित्ताने लाईमलाईटमध्ये आणण्याचा प्रयत्न असणार आहे. व्यंगचित्रकारांसाठी याठिकाणी वेळोवेळी कार्यशाळा आयोजिण्यात येणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून आम्ही पुण्यात व्यंगचित्रकारांचा आंतरराष्ट्रीय महोत्सव भरवतो. त्यामाध्यमातून असंख्य व्यंगचित्रे आमच्याकडे गोळा झाली आहेत. ती सर्व या व्यंगचित्रांच्या गावात म्हणजे गोर्हे बुद्रूकमधील आर्ट गॅलरीत रसिकांना पाहायला मिळतील. याशिवाय कुणाकडे खूप दुर्मीळ अशी व्यंगचित्रे असतील तर त्यांनी ती आमच्यापर्यंत पोहोच करावीत. त्या व्यंगचित्रांनाही या गॅलरीत योग्य स्थान दिले जाईल.- धनराज गरड, व्यंगचित्रकार
लहानपणी टीव्हीवर पाहात असलेले ‘मालगुडी डेज’मध्ये ज्याप्रकारचे गाव आपण पाहात होतो, अगदी तशाच पद्धतीचे गाव साकारण्याची संधी आम्हा व्यंगचित्रकारांना मिळत आहे. अशा पद्धतीचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील पहिलेच व्यंगचित्रकारांचे गाव असेल. याठिकाणी कलेचा निखळ आनंद प्रत्येकाला लुटता येईल.- उन्मेश शहाणे, व्यंगचित्रकार