Madhav Pawar 
सोलापूर

Madhav Pawar death: ज्येष्ठ कवी, गीतकार माधव पवार यांचे निधन

सोलापूरचे ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचे बुधवारी पहाटे राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरचे ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार (वय 71, रा. निर्मिती टॉवर्स, मोदीखाना) यांचे बुधवारी पहाटे राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या 12-13 वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. सायंकाळी मोदी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

माधव पवार यांनी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वरिष्ठ लिपिक म्हणून 35 वर्षे सेवा बजावली. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार यांचे चिरंजीव होत.

विविध साहित्यकृतींची निर्मिती, पुरस्कारांनीही सन्मानित

साहित्याची ओढ असलेल्या माधव पवार यांचे हे ‌‘शुभशकुनांचे पक्षी‌’ आणि ‌‘गरुडभरारी‌’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या काव्यप्रतिभेची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यासह राज्यस्तरावरील 21 मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. हे ‌‘शुभशकुनाचे पक्षी‌’ कविता संग्रहास महाराष्ट्रातील सन्मानाचे 11 पुरस्कार, गरुडभरारी काव्यसंग्रह. याशिवाय अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित.

कवी माधव पवार यांनी लिहिलेली गीते महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी गायली आहेत. त्यांच्या गीतांच्या अनेक ऑडिओ कॅसेट आणि सीडी प्रकाशित झाल्या आहेत. सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, शकुंतला जाधव, जगदीश गोरसे, सुरेखा पुणेकर, बेला सुलाखे यांसारख्या दिग्गज गायकांनी त्यांच्या शब्दांना स्वरसाज चढवला आहे. पार्श्वगायक गायक प्रल्हाद शिंदे, त्यांचे पुत्र आनंद, नातू आदर्श शिंदे तिन्ही पिढ्यांसह दिग्गजांनी त्यांची गाणी गायली आहेत. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कविवर्य फ. मुं. शिंदे, गजलकार सुरेश भटांसह दिग्गजांशी स्नेह होता.

लोकप्रिय कवी माधव पवार यांचे निधन झाल्याने सामाजिक व्यथा मांडणार आणि नव्या पिढीला वैचारिक शिकवण देणारा कवी हरपला आहे. त्यांनी जीव ओतून सोलापूरकरांसाठी अनेक नव्या कविता दिल्या.
- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT