सोलापूर : ऐन दसरा सणाच्या काळात झालेले अतिवृष्टी व महापुराने भेंडी, गवार, काकडी व भोपळा यासारख्या भाजीपाल्यांचे दर तिप्पटपर्यंत वधारले. बटाटा, कांदा व लसूण याचे भाव मात्र बाजारात स्थिरच राहिले. या वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे अर्थकारण व महिन्याचे गणितच चुकले.
सध्या, दसरा सणाचा काळ आहे. या काळात शेकडो महिला उपवास करतात. तसेच, काही प्रमाणात पुरुषही उपवास करतात. उपवासाच्या फराळात भेंडीचा वापर अधिक केला जातो. म्हणून यंदा भेंडीने बाजारात शतक गाठले तर काकडीने तर दीडशेचा पल्ला गाठला. तसेच, भोपळ्याचेही दर तिपटीने वाढले.
काकडी, भेंडी, गवार, कारले आदी नियमित उपवासाच्या फराळात वापरले जाणार्या फळभाज्यांचे दर एकदम दुप्पट, तिप्पट व शतक पार केल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले. शिवाय, यामुळे त्यांचा महिन्याचा अंदाजपत्रकच चुकला.
सर्वच भाजीपाल्याचे दर हे जागेवरच वाढले. म्हणून बाजारातही त्याचे परिणाम झाले. काही भाजीपाल्याचे स्थिर राहिल्याने त्याचे खरेदी दरातच विक्री करावी लागले.- रोहिणी किलजे, भाजीपाला विक्रेते, सैफुल
अचानक बाजारातील भाजीपाल्याचे दर वाढले. याचा फटका गृहिणींना बसला. अशा भाववाढीने खरेदीवर परिणाम होतो. शिवाय, महिन्याची आर्थिक शिस्तच बिघडली.- सुवर्णा काळे, गृहिणी, वैष्णवी नगर