लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा File Photo
सोलापूर

Ashadhi Wari| लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

Ashadhi Wari| बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण; वारवरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण सोमवारी (दि. १५) बाजीराव विहिरीजवळ रंगले. आनंदाने वारकरी विठुनामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले होते.

बाजीराव विहीर परिसरात रिंगण्णाचा सोहळा वारकऱ्यांनी अनुभवला. यंदा प्रथमच रिंगण सोहळ्याचा आनंद महामार्गाच्या उड्डाणपुलावरून भाविकांना घेता आला. या भव्यदिव्य रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकऱ्यांचा शीण गेला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या मंगळवारी वाखरीत दाखल झाल्या. दरम्यान, द्वारी एक वाजता भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. त्यापूर्वी संत सोपान काका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघाला होता.

पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी संतांच्या पालख्यांचे दर्शन घेत आपापल्या सोहळ्यात सहभाग घेतला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणासाठी बाजीराव विहिरीसमोर आला. उड्डाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी उड्डाणपुलावर गर्दी केली होती.

दुपारी साडेतीन वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर माऊलीचा सोहळा गोल रिंगणासाठी शेजारील मोकळ्ळ्या रानात दाखल झाला. त्यापूर्वी मैदानावर वारकऱ्यांनी फुगड्या, सूरपाट्यांच्या खेळासह भारुडांचे कार्यक्रम सुरू केले होते. पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण पाहण्यासाठी

वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. सायंकाळी पाच वाजता माऊलींचा सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ-मृदंगांच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या भोवतीने रिंगण घातले.

त्यानंतर सोहळ्याचे चोपदार बाळासाहेब चोपदार, शितोळे सरकार यांच्यासह मानकऱ्यांनी रिंगणाची पाहणी केली. त्यानंतर मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरुवात झाली. पहिल्या फेरीनंतर माऊलींच्या अश्वाने स्वाराच्या अश्वाला पाठीमागे टाकत सुसाट वेगामध्ये रिंगण पूर्ण केले. यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी माऊली... माऊलीचा गजर केला.

पालखी सोहळा वाखरी मुक्कामी विसावला

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण, तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले.

यानंतर सायंकाळी पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ येथे विसावला.

मंगळवारी (दि. १६) वाखरी येथून दुपारी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पंढरपूरच्या वेशीवर आल्याने भाविक पांडुरंगाचा जयघोष करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT