वेळापूर : माळशिरस तालुक्यातील 22 गावांसाठी नीरा देवधरचे पाणी मिळावे, यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी याबाबत लक्षवेधीद्वारे विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित केला.
नीरा देवधर हा फक्त पाण्याचा प्रकल्प नसून महाराष्ट्र वाचविणार्या वंशज यांच्या दुर्दशेचा व त्यांच्या करूण कहाणीचा इतिहास आहे. शूरवीर सेना सरसेनापती संताजी घोरपडे यांनी सोळा वर्षे या संभाजीबाबादरा व अस्वलदरा या महादेवाच्या डोंगररांगांमधून औरंगजेबाला जर्जर केले. स्वराज्य वाचवले म्हणजेच महाराष्ट्र वाचवला. त्यांचे वंशज सरसेनापती शूरवीर बाबूराव पवार व मकाजी देवकते यांची भूमी म्हणजे ही 22 गावे आहेत. नीरा देवधर प्रकल्पामध्ये गेली 45 वर्षे हे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत फक्त निवडणुकीसाठी वापरण्याचा मुद्दा म्हणून पाहिले गेले आहे. गेली अनेक वर्षे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले आहे.
गेल्या अधिवेशनात पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना मी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी विखे-पाटील यांनी सांगितले होते की, प्रसंगी आम्ही कर्ज काढून जे जे पूर्वीचे सर्वात जुने प्रकल्प आहेत, ते प्रकल्प आधी मार्गी लावू. जुने कोणत्याही प्रकारचे प्रकल्प आम्ही पाठीमागे ठेवणार नाही. परंतु आतापर्यंत या 16 गावच्या उपसा सिंचन योजनेससुद्धा साधी मंजुरी दिली नाही. या पूर्ण योजनेचे 100 दिवसात टेंडर काढले जाणार का? आणि ज्या शूरवीर संताजी घोरपडेंच्या सैन्यामध्ये लढलेले हे त्यांचे वंशज आहेत आणि ज्याठिकाणी संताजी घोरपडे यांचा वध झाला, त्यातील ही 22 गावे आहेत.
या 22 गावांमधील कन्हेर, इस्लामपूर या संघावरती संताजी घोरपडे यांचा वध करण्यात आला. सोळा वर्षे ज्या माणसाने या भूभागात काढले. त्यांचे वंशज पाण्यावाचून गेली 45 वर्षे आम्ही वाट बघत आहोत. तरी या भागातील लोकांची अपेक्षा आहे की हा प्रकल्प सर्वात जुना असल्याने हा प्रकल्प सर्वात आधी पूर्ण करावा. यापुढील काळात यापेक्षा अधिक वाट पाहायला आम्हाला लावू नका. आपण 100 दिवसांमध्ये या धरणाच्या उर्वरित कामांचे टेंडर काढावे, अशी मागणी विधिमंडळात आमदार जानकर यांनी केली.