सोलापूर

Solapur Rain: विजांच्या कडकडाटासह अवकाळीने मोठे नुकसान

15.7 मिमी पाऊस; रस्ते जलमय, विजयपूर नाक्याजवळ झाड कोसळले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. विजयपूर रोडवरील नागनाथ मंदिराजवळ पावसासह वाऱ्याने झाड पडले. रस्ते जलमय होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. गत 24 तासांत सोलापुरात 15.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहरातील वातावरणात सातत्याने बदल दिसून येत होता. सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊणतास बरसलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय बनले होते. अचानक सुरू झालेल्या पावसाने सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना विजांच्या कडकडाटासह झोडपून काढले.

गेल्या आठवडापासून शहराच्या तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक घामेघूम झाले होते. उकाड्याने त्रस्त झाल्याने त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक बेजार झाले होते. सातत्याने वाढत जात असलेल्या ऑक्टोबर हिटमुळे अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. मागील दोन दिवसांपासून सोलापुरात पाऊस चांगलाच पडत आहे. गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी पहाटेपर्यंत शहरात पावसाने हजेरी लावली.

शहरातील नवी पेठ, कुंभार वेस, अक्कलकोट रोड, आसरा चौक, जुळे सोलापूर, होटगी रोड, सात रस्ता, नई जिंदगी, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी परिसरात चांगला पाऊस पडला. दुपारपासूनच ढग आणि उन्हाचा खेळ रंगला होता. सायंकाळी चार नंतर पाऊस पडेल असे वातावरण निर्माण होऊन पावसाला सुरुवात झाली. सुमारे पावण तास पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे तापमानात घट झाली.

शहरातील सखल भागांत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. सरस्वती चौक, नवी वेस पोलिस चौकी, बसस्थानक, जुने पुना नाकापर्यंतच्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याने वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतुक पोलीसांना वाहतुक नियमनासाठी रस्त्यावर उतरावे लागले. तर होटगी रोडवरील चेतन फोंन्ड्रीजवळ, डिमार्ट चौकातही पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. शुक्रवारी सोलापूरचे तापमान कमाल 31.147 अंश सेल्सिअर तर किमान तापमान 23.1 सेल्सिअस असे नोंदले आहे.

आजपासून पुन्हा पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून (दि. 25) बुधवारपर्यंत (दि. 29) कमीअधिक प्रमाणात सोलापूर परिसरात पाऊस होऊ शकतो. सामान्यतः सोलापूर परिसरात जून ते सप्टेंबर या दरम्यान पाऊसकाळ असतो. परंतु यंदा पावसाळा काहीप्रमाणात पुढे सरकला असून पुढील सप्ताहभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT