पंढरपूर : कॉरिडॉरबाधित महिलांनी चौफाळा येथे एकत्रित येत ‘नो कॉरिडॉर नो डीपी’च्या राख्या पाठवत आंदोलन केले. Pudhari Photo
सोलापूर

Solapur News : कॉरिडॉरबाधित महिलांचे अनोखे आंदोलन

पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवल्या ‘नो कॉरिडॉर, नो डीपी’च्या राख्या

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : ज्या लाडक्या बहिणींनी देवाभाऊचे सरकार यावे, यासाठी देव पाण्यात ठेवले होते. त्याच सरकारने आमच्या घरांवर नांगर फिरवू नये, अशी मागणी केली. येथील कॉरिडॉरमधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत ‘नो कॉरिडॉर नो डीपी’च्या राख्या पाठवून अनोखे आंदोलन केले. येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील चौफाळा येथे सदर आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यासाठी विविध आंदोलनेदेखील केली जात आहेत. कॉरिडॉर अंतर्गत बाधित होणार्‍या कुटुंबातील महिलांनी एकत्र येत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी ‘नो कॉरिडॉर नो डीपी’ चे लेबल लावलेल्या राख्या तयार केल्या होत्या. सदर राख्या पोस्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टाने पाठविण्यात आल्या.

तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या फलकाला रक्तांचा टिळा लावला. तसेच ओवाळून नो कॉरिडॉर, नो डीपीच्या राख्यादेखील बांधल्या.तसेच महिलांनी लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा, कॉरिडॉर रद्द करा, ‘लाडक्या बहिणींला ओवाळणी..कॉरिडॉरची करा बोळवणी’ आदी घोषणा दिल्या.

लोकसभेला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून, तसेच राज्यात पुन्हा देवाभाऊंचे सरकार यावे, यासाठी महिलांनी भरभरून मतदान केले होते. मात्र, हेच सरकार आमच्या घरावर आता वरवंटा फिरवत आहे. यास आमचा कडाडून विरोध आहे.
-डॉ. प्राजक्ता बेणारे, जिल्हाध्यक्षा, भाजप महिला आघाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT