सोलापूर

Ujani Dam: उजनीतील पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखीव

पालकमंत्री गोरे यांनी घेतली टंचाई आढावा बैठक, 48 तासांत मिळणार टँकरला मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : यंदा पावसाळ्यावर एल निनोचा प्र्रभाव होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने उजनी धरणातील पाणी 31 ऑगस्टपर्यंत जेवढे पुरेल तेवढे राखीव ठेवून सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करा, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. सोमवारी नियोजन भवन येथे टंचाई आढावा बैठक झाली. बैठकीनंतर गोरे यांनी ही माहिती दिली.

सध्या सोलापूर जिल्ह्यात सात टँकर सुरू असून, टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. टँकर मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 48 तासांच्या आत टँकर सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे गोरे यांनी सांगितले.

दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने अल निनो सुरक्षा कवच पंचसूत्री राबवावी. यामध्ये पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पावसाचा खंड व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन आदीबाबत सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना जागृत करावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे केले आहेत.

क्यूआर कोडचे प्रकाशन

कृषी निविष्ठांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहज व सुलभ पद्धतीने तक्रार नोंदविता येईल, यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून क्यूआर कोड तयार करण्यात आलेला आहे. हा क्यूआर कोड प्रत्येक ग्रामपंचायत कृषी सहाय्यक कार्यालयात उपलब्ध करून दिला जाणार आहे, त्या अनुषंगाने संबंधित शेतकरी यावर तक्रार नोंदवतील व त्या तक्रारीची दखल घेऊन जास्तीत जास्त सात दिवसात त्याचे निवारण करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व मान्यवरांच्या उपस्थितीत या तक्रार निवारण क्यूआर कोडचे विमोचन करण्यात आले.

पालकमंत्री म्हणाले....

निविष्ठा विक्रेत्याने लिंकिंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई

जिल्ह्यात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दुप्पट करावे

अल निनो सुरक्षा कवच पंचसुत्रीचे पालन करावे

कृषी निविष्ठाच्या तक्रारीसाठी आता क्यू आर कोड उपलब्ध केला जाणार

यंदा खरीप हंगामसाठी 4 लाख 99 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

प्रलंबित असलेले डीपी दोन दिवसात दुरुस्त करु द्या

2 लाख 51 हजार 900 मेट्रिक टन इतका खत उपलब्ध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT