Ujani Dam Pudhari
सोलापूर

Ujani Dam: उजनी धरणातून विसर्ग सुरूच

भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : उजनी धरण १०० टक्के भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारी (दि. २८) दिवसभर तो कायम ठेवण्यात आला. धरणाच्या मुख्य दरवाजातून ६० हजार, पॉवर हाऊसमधून एक हजार ६००, सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २८०, टनेलमधून ९०० आणि मुख्य कालव्यातून दोन हजार ५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सायंकाळी धरणात सुमारे ५५ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने हा विसर्ग कायम आहे.

रात्री पाण्याच्या आवकेमध्ये वाढ झाली तर विसर्गातही वाढ करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील आणि नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. तरीदेखील गेल्या २४ दिवसांत घाटमाथा परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात तब्बल ७१.७८ टीएमसी पाण्याची भर पडली आहे.

भीमा खोऱ्यातील धरणांमधून विसर्ग सुरू

भीमा खोऱ्यातील २७ धरणे तसेच लघू व मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या घोड धरणातून १८ हजार, येडगाव धरणातून एक हजार, वडजमधून एक हजार ३००, भामा आसखेड एक हजार ७७८, वडिवळे दोन हजार ४५४, डिंभे धरणातून चार हजार ८८०, चासकमान धरणातून तीन हजार ६००, मुळशी धरणातून सात हजार २००, पवना धरणातून दोन हजार, कासारसाई ७५०, खडकवासला धरणातून दोन हजार ५६८ आणि वीर धरणातून आठ हजार ११४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बंडगार्डनमधून उजनीत ५४ हजार ५१५ क्युसेकची आवक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT