सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत एप्रिल अखेरपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबई येथे उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाली. तीत हा निर्णय झाला. यानुसर सात टीएमसी पाणी धरणातून सोडले जाणार आहे.
बैठकीस दुरदृश्य प्रणालीद्वारे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आ. सुभाष देशमुख, आ.सचिन कल्याण शेट्टी, आ. समाधान औताडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. अभिजित पाटील, जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन उपस्थित होते.
मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये पाणी सोडण्याचे तसेच उन्हाळी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन निश्चित करण्यात आले. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये तीन ते चारवेळा सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडले जात होते.
परंतू उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी झाल्यामुळे आता भीमा नदीत शहरासाठी पाणी सोडण्याचा विषय संपला आहे. त्यामुळे अतिरिक्त सुमारे पाच टीएमसी पाणी शिल्लक राहत असून, त्याचे वाटप सिंचनासाठी करण्याची आवश्यकता आहे. सध्या भीमा नदी कोरडी पडली असल्याने पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे त्वरीत पाणी सोडण्याची मागणी होत आहे.