सोलापूर

Ujani Dam: उजनीतून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल

पंढरपूरसह सांगोला, कासेगाव, मंगळवेढा पाणी योजना कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी बुधवारी दुपारी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत पोहोचले. पंढरपुरातील दोन्ही बंधारे भरून पाणी मार्गस्थ झाले आहे. नदीत पाणी आल्यामुळे पंढरपूर, कासेगाव, सांगोला, मंगळवेढा पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या असून पाणी टंचाईचे संकटही दूर झाले आहे. वाढत्या उन्हात पिकांना जीवनदान मिळाले आहे.

उजनी धरणातून दि. 23 एप्रिल रोजी सहा हजार क्यूसेक विसर्ग भीमा नदीत झाला. हे पाणी मजल दरमजल करत दि. 29 रोजी दुपारी चार वाजता पंढरपूर येथे दाखल झाले. भीमा नदीवर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांना पाणी उपलब्ध झाले आहे. पंढरपूर शहरासह कासेगाव, शिरभावी (ता. सांगोला) पाणीपुरवठा योजनादेखील सुरू झाली. त्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे पाणी सोलापूर येथे दाखल झाल्यानंतर भीमा नदीपात्रातील सर्व बंधारे भरून घेण्यात येणार आहेत.

चंद्रभागेत भाविकांच्या स्नानाची सोय

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला आलेले भाविक हे प्रथम चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतात; मात्र गेल्या आठवडाभरापासून चंद्रभागा नदीत केवळ डबक्यात पाणी साचलेले होते. तसेच नदीचे पात्र दुर्गंधीयुक्त झाले होते. त्यामुळे भाविकांना दुषित पाण्यातच स्नान करावे लागत होते. अखेर बुधवारी चंद्रभागेत पाणी आल्याने भाविकांना आता चांगल्या पाण्यात स्नान करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT