सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा पहिल्यांदाच मे महिन्यामध्येच शून्य पातळीवर येणार आहे. रविवारी (दि. 25) रात्री आठ वाजता दौंड येथून धरणामध्ये 10 हजार 684 क्युसेकने पाणी मिसळत आहे. त्यामुळे सध्या वजा पातळीमध्ये असलेले धरण मंगळवारी (दि. 27) रोजी शून्य पातळीवर येणार आहे. मंगळवारपासून धरणाच्या पाणीपातळीचा प्रवास अधिकच्या दिशेने सुरु होणार आहे.
उजनी धरण परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत चार दिवसांत तब्बल चार टीएमसीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता धरणाची पाणीपातळी वजा 16.94 टक्के झाली आहे. धरणात दौंड येथून पाणी येत असल्याने पामीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
उजनी धरणाबाबत सकारात्मक बातमी असताना फलटण पट्यात झालेल्या मुसळधार पावसाने लाटे येथून 26 हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत येत आहे. ते पाणी पुढे नीरा नृसिंहपूर येथे भीमा नदीत मिसळणार आहे. रात्री आठ वाजता नीरा नरसिंहपूर येथील भीमा-नीरा संगमावर 12 हजार 200 क्युसेकचा विसर्ग होता. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील पावसाने सीना, भोगावती या नद्याही वाहू लागल्या आहेत. रविवारी सकाळी कोर्सेगांव (ता. अक्कलकोट) बंधार्यापर्यंत पाणी पोहचले आहे.
यंदा उजनी धरणातील पाणीपातळी 14 मे रोजी वजा 22.96 टक्यापर्यंत खाली गेली होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून धरण क्षेत्रावर पाऊस सुरु आहे. मान्सून पूर्व पावसामुळे 18 मेपर्यंत उजनी पाणीपातळी स्थिर राहिली होती. उजनी धरण परिसरात सलग पाच दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने उजनीत पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी रविवारपासून बंद करण्यात आलेे. बोगद्याच्या माध्यमातून 200 क्सुसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणामध्ये दौंड येथून 10 हजार 684 क्युसेकने पाणी येत आहे.
उजनी धरणात यंदा मे महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. मे च्या पहिल्या आठवड्यात कालव्याच्या माध्यमातून नदीला सोडण्यात येणार्या पाण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार सुभाष देशमुख यांनी एक दिवसाचे आंदोलन केले होते. पण, यंदा मे महिन्यातच धरणात पाणी येऊ लागल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.