भीमानगर : सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण आज गुरुवारी शंभर टक्के भरणार असल्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात टंचाईच्या काळात वजा 23 टक्के पाणीसाठा उरलेले उजनी धरण सध्याच्या चांगल्या पर्जन्यमानामुळे अधिक 98 टक्के भरले असून ते आज शंभर टक्के होईल अशी शक्यता आहे.
चालू पर्जन्यमानाच्या काळात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कधी नव्हे ते उजनी धरण मे जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले. परंतु पूर परिस्थिती ओळखून प्रशासनाने भीमा नदीत पाणी सोडून पाण्याचा समतोल राखला आहे. 21 जुलै 2025 रोजी उजनी धरणात वजा 22.96 टक्के पाणी साठा होता. मे महिन्यात पावसाने दमदार सुरवात केल्याने 31 जुलै रोजी धरण वजा मधून निघून अधिक 24.11 टक्के झाले. धरणात 76.57 टीएमसी पाणीसाठा झाला. 10 दिवसात 25.21 टीएमसी पाणीसाठा झाला. 20 जूनपासून उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
30 जून 2025 रोजी उजनी धरणात अधिक 72 टक्के होऊन 102.23 टीएमसी एकूण पाणीसाठा उपलब्ध झाला. 31 जुलै 2025 रोजी 97.13 टक्के होऊन 115.70 टीएमसी पाणी उजनी धरणात उपलब्ध होते. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणात 98.23 टक्के होऊन 116.29 टीएमसी पाणीसाठा झाला. सहा ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता धरणात एकूण पाणीसाठा 116.29 टीएमसी झाला. या दरम्यान भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे.