सोलापूर : उजनी धरणात दौंड येथून ७५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरण शनिवार सायंकाळपर्यंत ८५ टक्के इतके भरले आहे. धरणात एकूण १०९.२८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला. त्यामुळे जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला असला तरी सोलापूरकरांना पाण्यापासून दिलासा मिळाला.
रविवारी सायंकाळी ६ वाजता ५३ हजार ७१७ क्युसेक विसर्ग सुरू होता. वीर धरणातून २४ हजार क्युसेक विसर्ग चंद्रभागेच्या पात्रेत येत असल्याने पंढरपूर येथील जुना दगडीपूल पाण्याखाली जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. गत पाच महिन्यांपासून कोरडी पडलेली भीमा नदी आता दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पुढील वर्षभर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
उजनीतून सीना माढा उपसा सिंचनसाठी २८० क्युसेक, दहिगाव उपसा सिंचनसाठी ९० क्युसेक, बोगद्यातून ९०० क्युसेक, मुख्य कालव्यातून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येत्या दोन दिवसांत धरणातील पाणी पातळी ही ९५ टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे.