सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पुणे आणि घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळेे पाणी पातळीत वाढ होत आहे. सोमवारी (दि. ६) दौंडमधून उजनी धरणात सायंकाळी ६ वाजता ५४ हजार २४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो विसर्ग आणखी वाढणार असून, येत्या पाच दिवसांत उजनी पाणी पातळी ‘मायनस’मधून ‘प्लस’मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. रविवारी सकाळी मायनस २८.११ टक्के पाणी पातळी असलेल्या उजनी धरणात सोमवारी सायंकाळी सहा वाजता २५.७५ टक्के पाणीसाठा झाला.
सकाळी सहा वाजता दौंडमधून १४ हजार ३५१, दहा वाजता २४ हजार क्युसेक एवढ्या वेगाने पाणी येऊ लागले आहे. त्यात पुन्हा वाढ होत सायंकाळी ६ वाजता ५४ हजार २४३ इतका झाला आहे. लोणावळा, भीमाशंकर या परिसरात अतिवृष्टी होऊ लागल्यामुळे पुण्यातील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. उजनी धरणाच्या वर असलेल्या सुमारे १९ धरणातील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. भीमा खोऱ्यात सुरू असल्याने पावसामुळे दिलासा मिळाला आहे.