सोलापूर : वृक्ष लागवडीचे महत्त्व ओळखून उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे येथील परशुराम लांबतुरे यांनी झाडांची भिशी नावाचा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. त्यातून प्रत्येक सदस्यांकडून प्रति महिना शंभर रुपये गोळा करून एका वर्षात दोन हजार रोपांचे वृक्षारोपण केले आहे. तसेच पुढील काळात गु्रपच्या मदतीने लाखो झाडे लावण्याचा संकल्प या गु्रपने केला आहे.
लांबतुरे यांना झाडे लावून ते जगविण्याचा छंद होता. मात्र, विविध ठिकाणी झाडे लावताना आर्थिक अडचणी येत असल्याने त्यांनी झाडांची भिशी नावाचा व्हॉटस्अॅप गु्रप एक वर्षापूर्वी तयार केला. त्यातून प्रत्येक सदस्यांकडून प्रति महिना शंभर रुपये गोळा करण्यास सुरुवात केली. प्रारंभी भिशी गोळा होताना अनेक अडचणी आल्या. मात्र लांबतुरे यांनी स्वतः एक हजार रुपये भिशी देण्याचे ठरविल्याने ग्रुपमधील सदस्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रुपमधील जवळपास सर्वच सदस्यांकडून प्रति महिना शंभर रुपये देण्यास सुरुवात झाल्याने मागील एका वर्षात तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, भिशीचे सदस्य हळूहळू वाढत गेले असून, सध्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे 491 सदस्य झाले आहेत. त्या सदस्यांकडून प्रति महिना 30 ते 40 हजार रुपयांची रक्कम गोळा होत आहे. त्या रक्कमेतून विविध ठिकाणी लहान मोठी रोपांची लागवड केली जात आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर, आचेगाव, कुंभारी, उटगी, बोरामणी, मंद्रूप येथे रोपे लावण्यात आली आहेत. त्यासह मोहोळकर तांडा, चिरका तांडा, नळदुर्ग वाहतूक विभाग, मंगळवेढा येथील बाळूमामा मंदिर, पवार पोलिस अकॅडमी, जुळे सोलापूर, ओम गर्जना चौक परिसर, द्वारकाधीश जवळील सोसायटी, रेणुकानगर, स्मृती उद्यानाजवळील रेल वनविहार, सिद्धेश्वर वनविहार, कुमठे व परिसर, सिद्धेश्वर कारखाना स्मशानभूमी, तळे हिप्परगा, आहेरवाडी जवळील इंग्लिश मीडियम स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
झाडांची भिशी व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमांतून सोलापूर शहर, जिल्ह्यातील अनेक भागात वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच कर्नाटक, बीड येथील ठिकाणी गु्रपच्या माध्यमांतून शेकडो रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण करत आहे. वृक्षारोपणाची चळवळ वाढविण्यासाठी झाडांची भिशी नावाचा व्हॉटस्अॅप ग्रुप एका वर्षापूर्वी तयार केला आहे. त्या ग्रुपच्या आधारे वर्षात दोन हजारांपेक्षा जास्त वृक्षारोपण केले आहे. त्यासाठी अनेकांचे योगदान लाभले आहे.- परशुराम लांबतुरे, ग्रुप अॅडमिन