Drowning incident: दोन शालेय मुलांचा ओढ्यात बुडून मृत्यू Pudhari Photo
सोलापूर

Drowning incident: दोन शालेय मुलांचा ओढ्यात बुडून मृत्यू

कासाळ येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

महुद : सांगोला तालुक्यातील महिम येथे कासाळ ओढ्याच्या पात्रात पडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. धुणे धुण्यासाठी महिला नातेवाईकांसमवेत हे दोघेही ओढ्यावर गेले होते. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र घरगुती साफसफाईची मोहीम जोरात सुरू आहे. अनेकजण अंथरूण पांघरूण धुण्यासाठी ओढ्यांचा आधार घेत आहेत. घरगुती कपडे धुण्यासाठी महिम येथील गोरवे कुटुंबातील महिला कासाळ ओढ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा भाचा असलेला श्रीधर किरण ऐवळे ओढ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी जवळच उभा असलेल्या सोमनाथ विठ्ठल ऐवळे या नववीतील विद्यार्थ्यानेही पोहायला येत असल्याने पाण्यात उडी घेतली.

मात्र घाबरलेल्या श्रीधरने सोमनाथला मिठी मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हे दोघे विद्यार्थी जेथे बुडाले तिथे सुमारे पंधरा फूट खोल पाणी होतेे. शनिवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पाण्याला ओढ होती. त्यामुळे दोघेही ओढ्याच्या मध्यभागी वेगवान प्रवाहात आले. ओढ्याची पाणी पातळीही वाढली होती.

दरम्यान, ही माहिती तात्काळ सांगोला पोलिसांना तसेच महसूल विभागाला कळविण्यात आली. घटनास्थळी तात्काळ पोलीस निरीक्षक विनोद घुगे व इतर पोलीस कर्मचार्‍यांसह मंडलाधिकारी प्रशांत जाधव, महिम गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील अभय रुपनर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे आले.

शोध पथकाने मृतदेह बाहेर काढले

महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे गावकरी धावत आले. काही तरुणांनी पाण्यात उडी मारून शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यास यश आले नाही. महसूल व पोलीस प्रशासनाने पंढरपूर येथील शोध पथकातील तरुणांना बोलावून घेतले. या पथकातील तरुणांनी दोघाही विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT