कुर्डूवाडी : बँकेतून काढून कार गाडीतील डिक्कीत ठेवलेले दोन लाख रुपये चोरट्याने लांबविले. ही घटना गुरुवार, दि. 28 रोजी सकाळी 11.20 ते 11.40 वा. दरम्यान कुर्डूवाडी बायपास रोड जवळील बंद टोलनाक्याजवळ घडली.
फिर्यादी संतोष लक्ष्मण गोरे (वय 45, रा. सापटणे भोसे, ता. माढा) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऊसतोड मुकादमाला पैसे देण्यासाठी म्हणून फिर्यादी यांनी बँक ऑफ इंडिया शाखा कुर्डूवाडी येथे आपल्या चेकने दोन लाख रुपये काढले. या दरम्यान तोंडावर व गळ्यावर हिरवे, पांढरे व काळे रंगाचे गोल आकाराचे मास्क परिधान केलेल्या अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या पाठीमागे असलेल्या व्यक्तीला पैसे काढावयाची पावती लिहून दिली आणि फिर्यादीच्या हालचालीकडे लक्ष देत होता.
फिर्यादी कॅशियरने दिलेले दोन लाख रुपयांची रक्कम हातामध्ये घेऊन बँकेसमोर उभा केलेल्या इरटिगा गाडी (एम.एच.46 ए.एल. 5544) मधील डिक्कीत पासबुकसह दोन लाख रुपये ठेवले. त्यावेळी तोच वरील अनोळखी इसम फिर्यादीच्या हालचालीकडे लक्ष देत फोनवर कोणाला तर बोलत होता. त्यानंतर फिर्यादी माढा रोडने बायपास रोड जवळील बंद पडलेल्या टोलनाक्या जवळील एका हॉटेल समोर चहा पिण्यासाठी 11.40 वा. सुमारास गाडी लॉक करुन खाली उतरले. चहा पिऊन गाडीजवळ आले असता गाडीच्या डाव्या साईडचा दरवाजा व डिक्की उघडी दिसली. डिक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपयांची ठेवलेली प्लास्टीक पिशवी दिसली नाही.