सोलापूर : शिवयोगी सिद्धेश्वर यात्रा अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, श्री सिद्धेश्वर देवस्थानच्यावतीने भाविकांसाठी दासोहमध्ये महाप्रसादाची तयारी सुरू केली आहे. सुमारे एक लाख ज्वारी, एक लाख बाजरीची कडक भाकरी बनविण्याचे काम सुरू असून, 40 हजार शेंगा पोळ्याचा प्रसाद म्हणून भाविकांसाठी दिला जाणार आहे.
श्री सिध्दरामेश्वरांची यात्रा आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून देवस्थान समितीच्यावतीने जय्यत तयारी चालू आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना यात्रा कालावधीत दहा दिवस महाप्रसादामध्ये ज्वारी व बाजरीची कडक भाकरी, चपाती, शिरा, गरगट्टा, भात आणि शेंगा पोळीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांची यात्रा म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणी असते. आबालवृध्दांना यात्रेची आतुरता असते.
तैलाभिषेक (यण्णीमज्जन) पासून शोभेच्या दारूकामपर्यंत होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांत लाखो भाविक सहभागी होतात. यात्रा कालावधीत श्रींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगणातून लाखो भाविक येतात. या भाविकांच्या महाप्रसादाची सोय दासोहमध्ये पूर्णत्वाकडे येत आहे. यात्रेच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे तैलाभिषेकापासून भाविकांना महाप्रसाद म्हणून ज्वारी व बाजरीची कडक भाकरी, चपाती, गरगट्टा, भात आणि शेंगा पोळी असणार आहे.
दहा हजार प्रसादाचे पाकीट
नंदीध्वजधारकांना देवस्थानच्यावतीने तैलाभिषेक आणि अक्षता सोहळ्याच्या दिवशी केळी आणि चिवडा पाकीट प्रसाद म्हणून वाटप केले जाते. त्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. सुमारे दहा हजार प्रसादाचे पाकीट तयार केले जाणार आहे.
यात्रा काळात उत्तम नियोजन
अडीचशे भाविकांना महाप्रसाद दासोहमध्ये एकाचवेळी घेता येईल. सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत आणि सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत दासोहमध्ये भाविकांना महाप्रसाद घेता येईल, असे उत्तम नियोजन देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याचे देवस्थानचे विश्वस्त विश्वनाथ लब्बा यांनी सांगितले.