बार्शी : बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावरवरील कुसळंबजवळील टोलनाक्यावर दुचाकीला टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 16) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. नानासाहेब आप्पाराव शेंडगे (वय 62), विनायक हरिदास मुंडे (71, दोघे रा. उपळाई, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ते फवारणीपंप दुरुस्तीसाठी बार्शीला आले होते.
रमेश नानासाहेब शेंडगे (30, रा. उपळाई, ता. कळंब) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते त्याचे पिकअप नंबर एम. एच.25/पी. 5929 यामध्ये भुसार माल घेऊन उपळाई (ता. कळंब) येथून बार्शी येथे आले होते. बार्शी येथे भुसार माल खाली करुन परत बार्शी येथून येरमाळा येथे गेले. दरम्यान सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांचे मित्र अमोल हरभरे (रा. उपळाई, ता. कळंब) यानी फोन करून सांगितले की त्यांचे वडील नानासाहेब शेंडगे व विनायक मुंढे हे दोघे मोटार सायकल नंबर एच. एच25/ए. एक्स 2562 वरुन बार्शी येथून बार्शी ते कुसळंब रोडने गावी येत होते. कुसळंब गावाजवळ वडीलांच्या ताब्यातील दुचाकीस टिप्पर नंबर एम. एच. 13/सी. यु 6095 हीने समोरुन जोराची धडक दिली. त्यात तुझे वडील जागीच ठार झाले तर विनायक मुंढे यांना उपचारासाठी बार्शीला पाठविले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे राहुल बोंदर, रुपेश शेलार यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली. तालुका पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.