सोलापूर : जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी शेतकर्यांच्या उसाची सुमारे 84 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. त्या कारखान्यांनी 31 जुलैपर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिले होते. बिले जमा न करणार्या कारखान्यांवर कारवाईची शक्यता आहे. तसे संकेत पुणे प्रादेशिक साखर कार्यालयाने दिले आहे.
जुलै संपत असला तरी डिसेंबर 2024 मधील उसाची रक्कम अद्याप शेतकर्यांना मिळाली नाही. जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी शेतकर्यांचे 84 कोटी रुपयांची रक्कम थकवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालकाच्या आदेशानंतर जय हिंद शुगर, सिद्धेश्वर सहकारी आणि गोकूळ शुगरसह अनेक कारखानदारांनी किरकोळ रक्कम शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे.
मात्र, अद्यापही बरीच रक्कम जमा करणे बाकी आहे. दरम्यान, राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असण्याचा बिरुद मिळवणार्या सोलापूर जिल्ह्याने आणखी एक विक्रम केला आहे. हंगामात सर्वात जास्त शेतकर्यांची रक्कम थकवण्यामध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने शेतकर्यांच्या उसाची रक्कम देणे आणि त्यानंतर शेतकर्यांच्या उसाचे पैसे थकवणे असा नवीन प्रयोग जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी सुरू केला आहे. त्याचा शेतकर्यांना मोठा फटका बसत आहे.
हंगाम संपून सहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील शेतकर्यांना उसाच्या पैशासाठी कारखानदारांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. याबाबत शेतकरी संघटना वारंवार निवेदने तसेच आंदोलने करत आहेत; मात्र निगरगट्ट झालेली यंत्रणा त्यांना दाद देत नाही.
जिल्हाधिकारी, साखर आयुक्त कार्यालय, कारखानदार आणि शेतकरी संघटनामध्ये 17 जुलैला बैठक झाली होती. त्यामध्ये 30 जुलैपर्यंत शेतकर्यांची बिले जमा करण्याचे आश्वासन कारखानदारांनी दिले होते. जिल्हाधिकारी, साखर आयुक्तांनी सांगूनही कारखानदार बिले देत नसल्याचे प्रशासनाचे कारखानदारांवर वचक राहिले नाही. येत्या दोन दिवसांत बिले जमा न झाल्यास कारखानदार आणि शेतकरी संघटनामध्ये संघर्ष सुरू होईल.- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी 84 कोटी रुपयांचे ऊस बिले थकवली आहेत. ती बिले 31 जुलैपर्यंत शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दिवसात बिले जमा न करणार्या साखर कारखानदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.- सुनील शिरापूरकर, प्रादेशिक सहसंचालक साखर, सोलापूर विभाग