सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहिरीचा कठडा ढासळल्याने दोन शाळकरी मुले मातीत खचून विहिरीत बुडाल्याची घटना गुरुवारी (दि. 1) घडली. यात भीमरत्न हरिश्चंद्र राजगुरू (वय 14) आणि नैतिक सोमनाथ माने (15) हे दोघे विहिरीत बुडाले. इतर तीन जण सुखरूपपणे विहिरीच्या बाहेर निघाले.
आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मुलांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे बोरामणी गावात शोककळा पसरली आहे. शाळेला सुट्ट्या लागल्याने पाच मित्रांनी पोहण्यास जाण्याचा बेत आखला. गुरुवारी विहिरीत पोहण्यासाठी गेल्यावर पोहताना अचानक विहिरीचा कठडा ढासळला.
बोरामणी गावात गुरुवारी साधारण साडेबाराच्या सुमारास दत्ता शेळके यांच्या विहिरीत पाच शाळकरी मुले पोहण्यासाठी गेली होती. अचानक विहिरीचा कठडा ढासळला. या दुर्घटनेत दोन मुले मातीत अडकली. इतर तिघांनी आरडाओरडा सुरु केल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत विहिरीत असलेल्या तिघांना पाण्यातून बाहेर काढले.
घटनास्थळी पोलिस प्रशासन, दक्षिण तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मुलांना बाहेर काढले. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांकडून याठिकाणी मुलांचे रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.