सोलापूर : सोलापूर शहरात घरफोडी, मोटारसायकल चोरी करणार्या दोन चोरट्यांना फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
शहरात सुरू असलेल्या घरफोडी व मोटारसायकल चोरीबाबत फौजदार चावडीच्या गुन्हे शाखेचे पथक तपास करीत होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने 50 सीसीटीव्ही फुटेज तपासून इतर तांत्रिक बाबींचा तपास केला. मोहोळ येथून दोघेजण चोरीचे सोने आणि मोटारसायकल विक्रीकरिता सोलापुरात येत असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. बंडू मधुकर पवार (वय 28, रा. ढोकबाभळगाव, ता. मोहोळ) आणि उमेश प्रकाश काळे (वय 32, रा. मलिकपेठ, ता. मोहोळ) अशी आरोपींची नावे आहेत.
पाच गुन्हे उघडकीस आले. त्यातील 23.2 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, दोन मोटारसायकली असा एकूण चार लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, प्रवीण चुंगे, परीट, भिमदे, दराडे, बडुरे, व्हटकर, चव्हाण, खरटमल, पाटील, गायकवाड, मोरे, माने, तुक्कुवाले, सोनवलकर, घाडगे, शेख यांनी पार पाडली.