Ashish Shelar 
सोलापूर

Ashish Shelar : जीवन समजून घेण्यासाठी साहित्याकडे वळा

मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन, लोकमंगल साहित्य पुरस्कार वितरण

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : साहित्य हे समाजाला विचार, संस्कार आणि संवेदनशीलता देणारे प्रभावी माध्यम असून, लोकमंगल साहित्य पुरस्कारांच्या माध्यमातून हीच जाणीव अधिक बळकट होते. प्रत्येकाला आपले जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांनी साहित्याकडे वळावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले.

सोलापुरातील ॲम्फी थिएटर येथे शनिवार, दि. 21 मार्च रोजी आयोजित लोकमंगल साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार व लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख होते. या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या उपस्थित होत्या. आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस यंत्रांवर अधिक अवलंबून झाला असून, निसर्ग, माणुसकी आणि भावनांपासून दूर जात आहे. अशा काळात प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक घटकाला समजून घेतल्यास जीवन अधिक समृद्ध होईल. प्रत्येकामध्ये चांगले पाहण्याची दृष्टी निर्माण झाली, तर जीवनात ‌‘मोगरा‌’ फुलेल, असेही शेलार यांनी नमूद केले.

समन्वयिका शोभा बोल्ली तसेच निवड समितीतील नितीन वैद्य, प्रा.डॉ. ऋचा कांबळे, शिरीष देखणे आणि डॉ. दत्ता घोलप यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात आशिष शेलार व अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. आभार शोभा बोल्ली यांनी मानले.

पुरस्काराचे मानकरी

प्रसाद कुमठेकर (वसई) यांच्या ‌‘इतर गोष्टी‌’, प्रदीप सिद्धभट्टी (बुलढाणा) यांच्या ‌‘विस्मरणाच्या अरण्यात‌’, चित्रा पालेकर (मुंबई) यांच्या ‌‘तर अशी सारी गंमत‌’ तसेच मयूरेश कुलकर्णी (पुणे) यांच्या ‌‘त्सुबाकी स्टेशनर्स‌’ या कादंबरीच्या अनुवादाला लोकमंगल पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानेश्वर जाधवर (बोरगाव, ता. बार्शी) यांच्या ‌‘शून्यरेषा‌’ या विज्ञान कादंबरीलाही सन्मानित करण्यात आले. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे यांना विशेष सन्मान देण्यात आला. प्रत्येक पुरस्कारामध्ये 25 हजार रुपये रोख रक्कम, गौरवचिन्ह आणि सोलापुरी चादर देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT