तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीत सोमवारी (20ऑक्टोबर 2025) सायंकाळी दीपावलीतील नरक चथुर्दशी व दर्श अमावस्येचा मुहूर्त साधत श्री काळ भैरवनाथाचा भेंडोळी उत्सव सोहळा पार पडणार आहे. काशीनंतर तुळजापुरात निघणाऱ्या या भेंडोळीला प्राचीन इतिहासाची झालर प्राप्त झाली आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या उजव्या बाजूला काळभैरवाचे उंच कड्यावर प्राचीन मंदिर आहे. शहराचा आद्य नागरिक अर्थात नगराध्यक्ष म्हणून येथील काळ भैरवाला अष्ठ भैरवांमध्ये मानाचे स्थान असून येथील काळ भैरवाच्या मंदिराचा इतिहास तुळजाभवानी मातेच्या मंदिराशी बऱ्याच अंशी निगडीत असल्याचे अनेक दाखले पौराणिक कथांमध्ये सापडतात. ज्यावेळी पृथ्वी भ्रमण करताना विश्वजननी श्री तुळजाभवानी माता तुळजापूरनगरीत पोहोचली. त्यावेळी तिच्यासाठी इच्छितस्थळ (जागा) शोधण्याचे काम मातेने काळभैरवावर सोपविले होते. स्वतःसाठी जागा शोधून झाल्यावर काळभैरवाने स्वतः त्याठिकाणी वास्तव्य केले. मातेने दिलेली आज्ञा तो विसरून गेला. तिच्यासाठी जागा शोधल्याचा निरोप त्याने वेळेत मातेला न दिल्याने राग अनावर झालेल्या मातेने काळभैरवाच्या श्रीमुखात भडकावली, अशी आख्यायिका आहे.
अनादी काळापासून या काळभैरवाच्या कड्यावर भेंडोळी प्रज्वलित करून ती मातेच्या मंदिरात आणण्यात येते. शेकडो पुजारी बांधव पेटलेली भेंडोळी खांद्यावर घेऊन मंदिरात दाखल होतात. मंदिर प्रदक्षिणा घालून ती भेंडोळी मातेच्या सिंहासनाला भिडविण्याचे कार्य वर्षानुवर्षे अखंडितपणे याठिकाणी चालू आहे. भेंडोळीचा उत्सव देशात काशीनंतर फक्त तुळजापुरात पार पडतो. त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राला काशीचे पुण्य लाभले आहे.