सतीश महामुनी
तुळजापूर : भीषण पाणीटंचाई, दुष्काळाची दाहकता आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य अशा प्रतिकूल परिस्थितीतही तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ‘कितीही अडचणी आल्या, तरी आई तुझ्या दर्शनाशिवाय नवरात्र कसे पूर्ण होणार?’ या श्रद्धेच्या भावनेतून भाविक तुळजापुरात दाखल होत असून, शहरात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे. मात्र, भाविकांची वाढती गर्दी आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील व्यवस्थापन, पोलिस बंदोबस्त आणि मूलभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
तुळजाभवानी मंदिर संस्थान, नगरपरिषद, पोलिस, महसूल आणि आरोग्य प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ तसेच महावितरण यांच्याकडून नवरात्र महोत्सवासाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. असे असले, तरी भाविकांना सुलभ दर्शन, पिण्याचे पाणी आणि विश्रांतीसाठी पुरेशी जागा मिळावी, या अपेक्षा अद्याप पूर्ण होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
तुळजाभवानी मंदिराचा परिसर, गाभाऱ्याची रचना तसेच दर्शनासाठी येण्या-जाण्याचे मार्ग निश्चित असतानाही मंदिर परिसरात गरजेपेक्षा अधिक पोलिस आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात असल्याची तक्रार भाविकांकडून केली जात आहे. गाभारा आणि मंदिर परिसरात पाच ते सात सुरक्षा रक्षक पुरेसे ठरू शकतात, असे मत व्यक्त होत असताना प्रत्यक्षात १५ ते २० सुरक्षा रक्षक आणि पोलिस कर्मचारी तैनात असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय नारळ विक्रेते आणि विविध कंत्राटांशी संबंधित व्यक्तींची गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची धावपळ उडत असल्याचे चित्र आहे.
खासगी सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी उद्धटपणे बोलणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे आणि त्यामुळे मंदिराच्या प्रतिमेला धक्का पोहोचणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वीही वादविवाद होऊनदेखील सुरक्षा रक्षकांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी या व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
नवरात्र महोत्सव हा भाविकांना सुलभ आणि शांततेत दर्शन घेता यावे, यासाठी असतो. मात्र, मंदिर परिसरात पोलिस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनावश्यक गर्दी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना थेट दर्शन देण्यावरून नुकताच खासगी सुरक्षा रक्षकाला पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. अशा घटनांमुळे मंदिराची प्रतिमा मलिन होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून स्पष्ट नियमावली लागू करावी, अशी मागणी होत आहे.
तुळजाभवानी देवीचे मंदिर हे श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रमुख केंद्र आहे. मात्र, मंदिर परिसरात आर्थिक व्यवहारांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना काही भाविकांकडून व्यक्त होत आहे. सशुल्क दर्शन व्यवस्थेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. तरीही अशा तक्रारींचे निराकरण होत नसल्याने दररोज नवे वाद निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. मंदिर संस्थानाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतानाही सशुल्क दर्शन व्यवस्थेबाबत तक्रारी होत राहणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची गरज आहे.
कडक उन्हात आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीत तुळजापुरात येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. दर्शनानंतर थकलेल्या भाविकांना काही काळ विश्रांती घेण्यासाठी पुरेशी जागा असणेही गरजेचे आहे. त्याचबरोबर दर्शनाची प्रक्रिया सुलभ, शिस्तबद्ध आणि त्रासमुक्त असावी, या भाविकांच्या माफक अपेक्षा आहेत.
मात्र, या मूलभूत सुविधांबाबत मंदिर प्रशासन आणि राज्य सरकारकडून अपेक्षित व्यवस्था होत नसल्याची नाराजी भाविक व्यक्त करत आहेत. नवरात्र महोत्सवाच्या काळात लाखो भाविक श्रद्धेने तुळजापुरात येतात. त्यामुळे त्यांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देणे, गर्दीचे योग्य नियोजन करणे, सुरक्षा रक्षकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आणि सशुल्क दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थानाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.