तुळजापूर ः मुख्य मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मातेचा गाभारा व सिंहासन फुलांनी सुशोभीत करण्यात आले होते. Pudhari Photo
सोलापूर

भाविकांनी फुलले तुळजापूर

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर ः संजय कुलकर्णी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारात कोजागरी पौर्णिमेचा सोहळा साजरा करण्यासाठी दहा लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने व्यापून गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. आई राजा उदो उदो च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दोन पौर्णिमा असताना भाविक गुरुवारीच आईच्या दरबारात हजर झाल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. जागा मिळेल तिथे थांबून काही क्षण विसावून मग देवीच्या पूजा विधीची कुठे सोय होती का, याचा शोध घेत भाविक पूजार्‍यांची घरे शोधताना दिसले. कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवारी (दि. 17) रात्री बारा वाजता छबिना निघाला. शुक्रवारी (दि. 18) मंदिर परिसरात छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सोलापूर येथील शिवलाड तेली समाज अंबाबाई मंदिराच्या दोन काठ्यांना अग्रस्थान आहे.

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सांगतेनंतर बुधवारी (दि. 16) रात्रीपासून कोजागरी पौर्णिमेच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. प्रशासनाने सोमवारी (दि. 14) सायंकाळपासून नेहमीचा तुळजापूर-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळे भक्तांना प्रवासासाठी जादा पैसे मोजून किमती वेळ गमवावा लागला. कोजागरी पौर्णिमेसाठी यावर्षी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील लाखो भाविक तुळजाभवानी मातेच्या नगरीत अनवाणी दाखल झाले. निद्रिस्त करण्यात आलेली मातेची मुख्य मूर्ती गुरुवारी पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापित केल्यानंतर मूर्तीला दोनवेळा पंचामृत अभिषेक केला. त्यानंतर नित्य पूजेची घाट होईपर्यंत लाखो भाविकांनी मातेच्या मुख, धर्म दर्शनाचा लाभ घेतला. नित्य पूजा सकाळी सहा वाजता झाल्यानंतर मूर्तीला पून्हा पंचामृत अभिषेक सुरू झाले.

सकाळी 11 वाजेपर्यंत या अभिषेकाच्या निमित्ताने असंख्य भाविकांनीमातेच्या गाभार्‍यातून दर्शन घेण्याची हौस पूर्ण करून घेतली. गुरूवारी सकाळी 11 वाजता सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या दोन मानाच्या काठ्या व पालख्यांचे येथे आगमन झाले. या काठ्या तुळजापूरच्या वाटेवर असताना बुधवारी सायंकाळी सिंदफळ येथील ग्राम दैवत असलेल्या मुद्गलेश्वर मंदिरात मुक्कामी राहून सकाळी येथील तीर्थात काठ्यांना स्नान घातल्यानंतर बारा लिगांचे दर्शन घेऊन घाटशिळ मार्गे या काठ्या तुळजापूर शहरात दाखल झाल्या. या काठ्या घाटशिळ रोडवरून भवानी रोड, जवाहर चौकातून देवीचे भोपे पुजारी सचिन पाटील व संभाजीराव पाटील यांच्या घरी मुक्कामी विसावल्या. या काठ्यांचा दोन दिवस मुक्काम होता.

या काठ्यांच्या मानकर्‍यांकडूनही मातेची महापूजा झाली. गुरुवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या काठ्यांनी मंदिराकडे प्रस्थान ठेवले. या काठ्यांना मातेच्या छबिना मिरवणुकीपूढे मानाचे स्थान असून मध्यरात्री 12 वाजता मातेची मंदिर परिसरात काठ्यांसह छबिना मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवारी सायंकाळीही या काठ्या छबिना मिरवणुकीसाठी मंदिरात सज्ज होणार असून या मिरवणुकीनंतर काठ्यांच्या मानकर्‍यांचा जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सत्कार केला. त्यानंतर खर्‍या अर्थाने अश्विनी यात्रेची सांगता झाली. छबिना मिरवणुकीच्या विहंगम सोहळ्यानंतर मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांनी मंदिर परिसरात मागितलेल्या मातेच्या जोगव्याने यात्रेची सांगता झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT