तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मोह निद्रेस आज, रविवारी (14 सप्टेंबर) भाद्रपद वद्य अष्टमी दिवशी सायंकाळी ‘आई राजा उदो उदो.. सदानंदीचा उदो उदो’ च्या जयघोषात उत्साहात सुरुवात झाली.
सायंकाळच्या नित्य पूजेनंतर मुख्य मूर्ती सिंह गाभार्यानजीक शेज घरातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. आठ निद्रा पूर्ण घेऊन नवव्या दिवशी मूर्ती आश्विन शुद्ध प्रतिपदेला सोमवारी (22 सप्टेंबर) पहाटे सिंहासनारूढ होत आहे. त्याच दिवशी दुपारी 12 वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होणार आहे.
रविवारी सायंकाळी नित्य पूजेनंतर मुख्य मूर्तीला पंचामृत अभिषेक पार पडले. सालंकृत पूजा, नैवेद्य, धुपारती-अंगारा पार पडल्यानंतर मुख्य मूर्ती चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. यावेळी मंदिराचे महंत, देवीचे भोपे, पाळीकर, उपाध्ये पुजारी, महिला आराधिनी, सेवेकर्यांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती.
सेवेकरी पलंगे परिवाराकडून शनिवारी दिवसभर मातेच्या शेजघराच्या साफसफाईसह पलंगाची डागडुजी करण्यात आली. मातेच्या गादी व उशासाठी लागणारा कापूस निवडण्यासाठी आराधिनी महिला व विणेकर्यांची दिवसभर लगबग सुरू होती.
छबिना मिरवणूक
22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार्या नवरात्रोत्सवात दररोज सायंकाळी छबिना मिरवणूक पार पडणार असून पाचव्या माळेपासून मातेच्या विविध रूपातील अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहे.
नवरात्र उत्सवात महापूजा
26 सप्टेंबर रथ अलंकार, 27 सप्टेंबर मुरली अलंकार, 28 सप्टेंबर शेषशाही अलंकार, 29 सप्टेंबर भवानी तलवार अलंकार, 30 सप्टेंबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहे. यादिवशी मंदिरातील होम कुंडावर दुपारी 1 वाजता वैदिक होम हवनास प्रारंभ होवून सायंकाळी 6.10 वाजता होमास पूर्णाहुती देण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी खंडेनवमी दिवशी मंदिरातील होम कुंडावर अजाबलीचा धार्मिक विधी होवून घट उठविण्यात येणार आहेत.