तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तीदेवता श्री तुळजाभवानी मातेची मंगळवारी (दि. 30) दुर्गाष्टमीदिवशी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात आली. मातेच्या विशेष अवतार पूजेचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध व महिलांनी मंदिरात दुपारनंतर मोठी गर्दी केली होती.
दुपारी 1 वाजता मंदिरातील होमकुंडावर शतचंडी होमास प्रारंभ झाला. यजमान म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार हे सपत्नीक धार्मिक विधीसाठी उपस्थित होते. पाच तासानंतर सायंकाळी 6.10 वाजता होमास भोपळे, कव्हाळे, श्रीफळची पूर्णाहुती देण्यात आली.
मंदिरातील होमकुंडावर बुधवारी (दि. 1) दुपारी बारा वाजता अजाबलीचा धार्मिक विधी पार पडून घटोत्थापनाने नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे. तहसील कार्यालयाचे शिपाई अजाबली विधीचे मानकरी आहेत. सिंदफळ येथील लांडगे कुटुंबियांकडून देवीच्या धार्मिक विधीसाठी बोकड देण्याची प्रथा आहे. श्री तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन व शिबिकारोहण गुरुवारी (दि. 2) पहाटे पार पडणार आहे. नगर व भिंगार येथून येणार्या पलंग-पालखीचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन होत असून पलंग-पालखीचे पूर्वज जानकोजी भगत (तेली) यांच्या समाधीस्थळापासून गुरुवारी मध्यरात्री वाजत-गाजत आई राजा उदो उदो... च्या जयघोषात ही पलंग व पालखी मंदिरात येईल.