तुळजापूर : ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’च्या जयघोषात महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीमातेच्या मंचकी निद्रेस उत्साहात सुरुवात झाली.
चलदेवता म्हणून सर्वदूर ख्याती प्राप्त असलेल्या तुळजाभवानीमातेची वर्षातून तीनवेळा निद्रा होते. शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान दोन वेळा आणि पौष शुक्ल महिन्याच्या पूर्वसंध्येला असे वर्षातील एकूण 21 दिवस देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलवून पलंगावर निद्रिस्त केली जाते. शनिवारी (20 डिसेंबर) सकाळी साडे सात वाजेपर्यंत मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अमावस्या होती. त्यानंतर पौष शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. सायंकाळच्या नित्य पूजेची घाट साडेपाच वाजता देण्यात येऊन सकाळच्या पूजेचे निर्माल्य विसर्जन केले.
मूर्तीवरील दागदागिने उतरविण्यात येऊन मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू करण्यातआले. त्यानंतर मूर्तीभोवतीचे मेण काढून मातेची शोड्षोपचार पूजा पार पडून नैवेद्य, धुपारती, अंगारा पार पडून मुख्य मूर्ती शेजघरातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्याचा धार्मिक विधी पार पडला. तत्पूर्वी शेजघरासह चांदीच्या पलंगाची साफसफाई व पलंगावरील गाद्या, उशा बदलण्यात आल्या. यावेळी मंदिराचे महंत, भोपे पुजारी, सेवेकरी, आराधिंनी महिला, पाळीकर पुजारी, मंदिराचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि मातेच्या हजारों भक्तांची उपस्थिती होती.