सोलापूर : यंदा शहरात दोन हजार 974 नवीन क्षयरुग्ण आढळून आले आहेत. तरीही अत्याधुनिक नवीन उपचाराच्या पद्धतींचा सकारात्मक परिणाम रूग्णांमध्ये दिसून येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात व्यापक क्षयरोग तपासणी मोहीम (सर्वेक्षण) केले. या मोहिमेतून दोन हजार 974 नवीन रूग्ण आढळून आलेले आहेत.
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून एका व्यक्तीपासून दुसरा व्यक्तीही बाधित होतो. तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा अभाव, कुपोषण व सुमार राहणीमान ही कारणे या रोगवाढीला कारणीभूत आहेत. येथील विविध वसाहतींमध्ये क्षयरुग्ण तपासणी मोहीम (सर्वेक्षण) राबविले. या मोहिमेत वयोवृद्धासह सेवानिवृत्त नागरिक, मधुमेही रुग्ण, कमी बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) असलेले आणि मागील पाच वर्षांत क्षयरुग्णांच्या सतत संपर्कात आलेली व्यक्ती आणि तसेच अन्य शारीरिक व्याधी असलेल्यांची या दरम्यान तपासणी केली. अतिशय थकवा, सातत्याने वजन घटणे, दीर्घकाळ खोकला, खोकल्यातून रक्त येणे आदी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर यावेळी लक्ष देण्यात आले. रुग्णांच्या आवश्यक चाचण्या करून नवीन पद्धतीचे उपचारही सुरू केले.
सकस आहारासाठी आर्थिक मदत
1,032 रुग्णांना प्रथिनयुक्त फूड बास्केट हे निक्षय पोषण उपाययोजनेतून वाटप करण्यात आले. तसेच सुप्तावस्थेतील क्षयरोग ओळखण्यासाठी उपयुक्त चाचण्यांचा वापर.
क्षय रूग्णांच्या तपासणीसाठी सध्या शासनाकडून आधुनिक पद्धतीच्या चाचण्यासाठी नवीन यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. ही यंत्रणा शहरातील सर्वच आरोग्य केंद्रात त्या मोफत उपलब्ध आहेत.- डॉ. अरुंधती हराळकर, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी मनपा