सोलापूर : पोलिस असल्याची बतावणी करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल 21 लाख 25 हजार रुपये उकळणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगारास सोलापूर शहर सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. राघवेंद्रसिंग पिता मुलचंद (वय 38, रा. हायटेंशन रोड, कपासहेडा, नवी दिल्ली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील साडेनऊ लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.
सोलापुरातील वृद्धाला कुलाबा पोलिस ठाण्यामधून सबइन्स्पेक्टर बोलत असून मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात तुम्ही अडकल्याचे, तसेच डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 21 लाख 25 हजारांची रक्कम ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले.
दरम्यान, तक्ररीनंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर एक्स्पर्ट टीमने दिल्लीतील मुलचंद याला 17 मार्च रोजी अटक केली. संशयिताने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीशैल गजा, पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे, प्रवीण भोपळे, गंगावणे, कृष्णात जाधव, प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, रतिकांत राजमाने यांनी पार पाडली.
डिजिटल अरेस्टचा संशय आल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क करावा. अनोळखी व्हिडीओ कॉल स्वीकारूच नका. मोबाईलचा विशेषतः पैशाशी संबंधित ॲपचा पीन, पासवर्ड कुणालाही शेअर करू नका.- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम