मंगळवेढा : मंगळवेढा - पंढरपूर हरित पालखी महामार्गावरील मंगळवेढा पंढरपूर रोडवरील बस थांब्याजवळ असलेल्या पन्नास फूट उंच असलेली दोन वडाची झाडे शुक्रवारी रात्री तोडण्यात आली आहेत. याबाबत संताप व्यक्त होत असून, संबंधित विभागाने याचा छडा लावून कारवाई करावी, अशी मागणी वारी परिवाराने केली आहे.
सहा वर्षांपूर्वी मोठा प्रोजेक्ट म्हणून वृक्षलागवडीचा हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. ही झाडे लहान असताना उन्हाळ्यात वारी परिवाराने सदस्यांच्या वाढदिवसाला विकत पाण्याचे टँकर घेऊन ही झाडे तळहाताच्या फोडीप्रमाणे जपली होती.
मात्र, अनेकजण आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी तसेच व्यावसायिक अडचण होते म्हणून ही झाडे तोडून टाकली आहेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वारी परिवाराच्या वतीने ही पाहणी करून संबंधित विभागाला माहिती दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व वारी परिवार यांच्या सहकार्यातून लावण्यात आलेल्या वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे.
याची त्वरित दखल घेऊन वृक्षतोड करणार्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी वृक्षप्रेमींच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत निवेदन मंगळवेढा पोलिस स्टेशनला देण्यात आले. यावेळी अजित जगताप, सुहास पवार, सतीश दत्तू, परमेश्वर पाटील, प्रफुल्ल सोमदळे, रतिलाल दत्तू, स्वप्निल फुगारे, आनंद निकम, स्वप्निल मोरे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती व वारी परिवार मंगळवेढा यांच्यावतीने मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी मार्गावर लावलेल्या व सात वर्षे जपलेल्या दोन वडाच्या झाडांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे. त्यांना जिल्हा पोलिस प्रमुख वृक्ष संवर्धन व पर्यावरण प्रेमी आहेत, या विषयात लक्ष घालून कठोर कारवाई करतील, ही अपेक्षा आहे.- सतीश दत्तू, अध्यक्ष, वारी परिवार, मंगळवेढा