सोलापूर : राज्यातील आश्रमशाळांमधील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून गुणवत्ताधारक शिक्षकांची निवड होणार आहे.
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या खासगी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेबाबत राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या शाळांमधील शिक्षक भरती आता पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेला गती आणि पारदर्शकता मिळणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे यांनी या संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळांमध्ये विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या आश्रमशाळा, विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळा यांचा समावेश आहे.
पवित्र पोर्टलद्वारे आश्रम शाळेत शिक्षक भरती होणार असून, या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासोबतच, सर्व शाळांसाठी एकसमान निकष लागू होण्यास मदत होणार आहे.