सोलापूर : तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधारसह अन्य शासकीय योजनांचे लाभ सहजासहजी मिळावेत यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने शहर जिल्ह्यातील 238 जणांना ओळखपत्राचे वाटप केले आहे. यामुळे, त्यांना योजनांचा लाभ मिळणे सुुलभ होणार आहे.
तृतीयपंथीय हे चौक किंवा महामार्गावर थांबून वाहनचालकांकडे पैसे मागतात. काही चालक देतात. अनेकजण त्यांना पैसे देणे टाळतात. अशावेळी मिळेल तेवढ्या पैशावर त्यांना समाधानी राहावे लागते. समाजही यांना जवळ करत नाही. यासाठी आता शासनच जवळ करत काही योजनांच्या माध्यमातून त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना ओळखपत्र दिली जात आहेत. त्यानंतरच्या काळात संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावला जाणार आहे. शिवाय, मतदान कार्ड, आधार कार्डासह शिधापत्रिकाही देण्यात येईल. सध्या, शहर जिल्ह्यातील 40 हून अधिक जणांना निराधार योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
निरामय संस्थेच्या माध्यमातून तृतीपंथीयांची शोध मोहीम घेतली जाते. त्यांची बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी काम चालू आहे. संस्थेच्या प्रयत्नाने 40 हून अधिक जणांना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. शिवाय, त्यांच्या आरोग्याबाबतचे शिबिरही घेतले जाते.- सीमा किणीकर, प्रकल्प अधिकारी निरामय आरोग्यधाम
पहिल्या टप्प्यात सामाजिक न्याय विभागाकडून ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कार्यालयाकडून 238 जणांना ओळखपत्रे दिली आहेत. जसे प्रस्ताव येथील तसे ती देण्याची प्रक्रिया या कार्यालयाकडून सुरू आहे.-सुलोचना सोनवणे-महाडिक, सहाय्यक आयुुक्त सामाजिक न्याय भवन