सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या आनलाईन जिल्हांर्तगत बदल्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये संवर्ग एकमधील 688 पैकी 654 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर 34 शिक्षकांच्या बदल्या थांबल्या आहेत.
संवर्ग एकमधील बदली झालेल्या 654 शिक्षकांमध्ये मराठी माध्यमांचे 626, कन्नड माध्यमांच्या 17 तर उर्दू माध्यमांच्या 11 शिक्षकांचा समावेश आहे. उर्वरित 34 शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत असून, केव्हा बदली होणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हांर्तगत बदलीसाठी जिल्ह्यातील सात हजार 837 पैकी चार हजार 438 शिक्षक पात्र आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण शिक्षकांपैकी निम्म्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बर्याच शाळांना नवीन शिक्षक मिळणार आहे.
विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग, दिव्यांग मुलांचे पालक, घटस्फोटित महिला शिक्षका, 53 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक, विधवा शिक्षिका, कुमारिका शिक्षिका तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमूद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, अशा शिक्षकांचा संवर्ग एक मध्ये समावेश आहे.
संवर्ग एकमधील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या आहेत. शनिवारी (दि.19) पासून संवर्ग दोन मधील 205 शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये पती, पत्नी एकत्रीकरण असलेल्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहे.