सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील औज ते होटगी दरम्यान बिर्ला साईडिंग येथे अचानक रेल्वे इंजिन रुळावरून घसरल्याची घटना शुक्रवार (ता. 3) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान औज-होटगी दरम्यान रस्ते वाहतुकीचे गेट बंद होते. गेट बंद असल्याने येथील ग्रामस्थ जवळपास तीन तास ताटकळत थांबले होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, बिर्ला सिमेंट कंपनीची मालवाहतूक करणारे रेल्वे इंजिन आणि रुळावरून घसरल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु या अपघातामुळे कोणत्याही मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम झाला नाही. मात्र येथील रस्ते वाहतूक पूर्ण ठप्प झाली. दीड तास गेट बंदमुळे वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकासह सोलापूर येथून दुर्घटना सहाय्य रेल्वे घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यानंतर घसरलेले रेल्वे इंजिन आणि रुळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मार्ग दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. जोपर्यंत रेल्वे इंजिन अन् रुळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत रस्ते वाहतूक सुरळीत होत नाही. यामुळे जवळपास तीन तास येथील ग्रामस्थांना रस्त्यावर ताटकळत थांबले होते. या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत.