बार्शी : तालुक्यातील बार्शी ते कुर्डूवाडी रेल्वे लाईनरील खांडवी-शेंद्री रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी (दि. 16) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वे आणि ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसून ट्रॅक्टरचा चालक बचावला.
याबाबत अधिक माहिती अशी, ट्रॅक्टर चालक रेल्वे लाईन ओलांडत होता. नेमक्या त्याचवेळी हडपसरकडून हैदराबादकडे जाणारी एक्स्प्रेस रेल्वे त्याच ट्रॅकवर आली. यावेळी रेल्वेने ट्रॅक्टरला उडवले. यामध्ये ट्रॅक्टरचे जागीच दोन तुकडे झाले.
ट्रॅक्टरचालक उडून लांब पडला; परंतु तो सुरक्षित आहे. अपघात झाला तरी रेल्वेमधील प्रवासी, ट्रॅक्टर चालक सुरक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धडक किरकोळ असल्याने रेल्वे मार्गाला कोणतीही गंभीर हानी झाली नाही. एक्स्प्रेस काही मिनिटांच्या विलंबानंतर पुढील प्रवासासाठी रवाना झाली, असे सांगण्यात आले.