सिद्धाराम म्हेत्रे, जयवंतराव जगताप, बळीरामकाका साठे, भगीरथ भालके. Pudhari File Photo
सोलापूर

Solapur : जिल्ह्यातील नेत्यांचा शिवसेनेकडे ओढा

म्हेत्रे, जगताप यांचा झाला प्रवेश; काका साठे, भालकेंचीही हालचाल

पुढारी वृत्तसेवा
संजय पाठक

सोलापूर : सध्याच्या राजकारणात भाजप जरी बलाढ्य पक्ष असला तरी सोलापूर जिल्ह्यात पक्षांतरासाठी अनेक मातब्बर नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेस प्राधान्य देत आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमधील अस्वस्थ नेते पक्षांतरचा निर्णय घेत आहेत. विशेष म्हणजे या सर्वच नेत्यांचा बलाढ्य भाजपकडे नव्हे तर शिंदेंच्या शिवसेनेकडे ओढा वाढत आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बळीरामकाका साठे हे शरद पवारांचे एकनिष्ठ नेते. साठे म्हणजे पवार आणि पवार म्हणजे साठे असे दीर्घकाळाचा सोलापूर जिल्ह्याचे समीकरण. तरी पक्षांतर्गत अस्वस्थेमुळे साठे हे पवारांबरोबरची दीर्घकाळाचा मैत्री तोडून पक्षांतरास तयार झाले. ते ही शिंदे यांच्या शिवसेनेतमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर चांगली पकड असलेला, सोलापूरच्या ग्रामीण भागाशी चांगला संपर्क असलेला हा नेता शिवसेनाला आयता मिळणार आहे. यामुळे एका बाजूला जिल्हा परिषद प्रशासनावर पकड व दुसर्‍या बाजूला ग्रामीण नाळ असलेला हा नेता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या पदरात पडत आहे. याचा जितका आनंद शिवसेनेला आहे तितकीच चिंता त्या निवडणुकीत युती न झाल्यास भाजपला निवडणूक काळात करावी लागणार हे मात्र खरे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील दुसर्‍या फळीतील नेतृत्व असलेले भगीरथ भालके हे काँग्रेसचे नवनेतृत्त्व. परंतु पक्षातील अवहेलना, सत्तेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांना होणारा त्रास यामुळे भालके यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे जवळपास निश्चित केले आहे. ते ही बलाढ्य भाजपात नव्हे तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशास प्राधान्य देत असल्याची वार्ता आहे. भालकेंच्या रूपाने पंढरपूर-मंगळवेढा भागातील गट-गणांसह अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकू शकतो. अर्थात या सार्‍या भालकेंच्या शिवसेना प्रवेशानंतरच्या जर तर च्या गोष्टी आहेत. असे असले तरी भाजपसारखा भक्कम जनाधार असलेला, सत्ताधारी पक्ष न स्वीकारता शिंदेंची शिवसेना स्वीकारण्याची भालकेंची मानसिकता का झाली असेल, याचा विचार आता भाजपने करण्याची वेळ आली आहे.

पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या करमाळा तालुक्यातील बडे प्रस्थ असलेल्या माजी आ. जयवंतराव जगताप यांनी देखील काही दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. जगताप यांचा प्रभाव हल्ली थोडाफार ओसरला असला तरी आता त्यांना शिवसेनेचा स्पर्श झाल्याने करमाळा तालुक्यात स्वतः जगताप आणि शिवसेनाही भविष्यात झळाळून उठेल असे कार्यकर्ते म्हणत आहेत. असे असले तरी याठिकाणी भाजप, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि सर्वच पक्षांपासून समान अंतर राखत परंतु त्या पक्षांच्या नेत्यांशी सलोख्याशी संबंध ठेवण्यात यशस्वी झालेले माजी आ. संजय शिंदे. या सर्वांशी आगामी निवडणुकांमध्ये जयवंतराव जगताप दोन हात करण्यात कितपत यशस्वी होतील, हे सध्यातरी स्पष्ट सांगता येत नसले तरी त्यांच्या रूपाने करमाळा तालुक्यात शिवसेनेला मात्र नव्याने बळ मिळणार आहे, हे निश्चित.

महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी बंधू शंकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनिशी शिवसेनेला जवळ केले. अर्थात यामागे त्यांचे स्थानिक राजकीय पैलू जरी वेगळे असले तरी त्यांनी शिवसेनेला पसंती दिली हा यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होय.

आ. खरेंना अडथळा पक्षांतर कायद्याचा

मोहोळचे आ. राजू खरे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होत. परंतु, मूळचे ते शिवसेनेचे आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय जडणघडण शिवसेनेच्या संस्कृतीप्रमाणेच झाली आहे. त्यांचा सर्व मित्रपरिवार शिवसेनेतच आहे. त्यामुळे ते सध्या जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असले तरी ते मनाने शिवसेनावासीच आहेत. त्यांना शिवसेनेत जाण्याची खूप इच्छा आहे. मात्र, त्यांना अडथळा आहे तो लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या पक्षांतर कायद्याचा. परंतु, भविष्यात आ. खरे देखील शिवसेनावासी होणार हे सध्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT